Description
मी येथे समग्र रामचरित्राचे विवेचन करू इच्छीत नाही. मी येथे फक्त दोन मुद्द्यांपुरते स्वतःला मर्यादित करून घेत आहे. रामाने केलेली तथाकथित शंबूकहत्या आणि तथाकथित सीतात्याग ही रामावर टीका करण्यामागची सर्वाधिक महत्त्वाची दोन कारणे आहेत. त्यांची ऐतिहासिकता किती खरी आणि किती खोटी, याविषयीचे विवेचन मी पुढे करणार आहेच. येथे मी इतकेच नोंदवतो, की रामाविषयीची माझी भूमिका मी कधी लपवून ठेवलेली नाही. सातारा जिल्ह्यातील वाई येथून प्रकाशित होणाऱ्या ‘नवभारत’ या मासिकात इ.स. १९७४ मध्ये मी शंबूकाविषयी लेख लिहिला होता. किमान तेव्हापासून मी रामाविषयीची माझी ती भूमिका लिखित स्वरूपात लोकांपुढे वारंवार मांडत आलो आहे. आज पूर्वीची भूमिका बदलून मी काही नवे मांडत आहे, असे मुळीच नाही.
रामाची चिकित्सा करण्याला माझा विरोध मुळीच नाही. शिवधर्माचाही नाही. शिवधर्मगाथेत तसे निःसंदिग्धपणे स्पष्ट केले आहे. माझे म्हणणे इतकेच, की चिकित्सा न्याय करणारी असावी. चिकित्सा करताना आपण आपल्या पूर्वग्रहांत गुंतून पडायचे, की सत्याला सामोरे जायचे, हे ठरवावेच लागेल. जे सत्य म्हणून समोर येत असेल, ते असत्य आहे, अशी आपली खात्री असेल, तर तसे जरूर सिद्ध करावे. तसे करण्याला माझा तरी विरोध नाही. सध्या इतकेच.






Reviews
There are no reviews yet.