Description
महिषासुराने देवांच्या पुढे झुकण्यापेक्षा प्राणांचा त्याग करणे श्रेयस्कर मानले. सांस्कृतिक गुलामगिरी स्वीकारण्याऐवजी मृत्यू पत्करणे स्वाभिमानाचे मानले. युद्ध म्हटले, की जय-पराजय अटळ असतात. कोणाचा पराभव झाला अथवा मृत्यू झाला, तर त्यामुळे माणूस म्हणून तो कमी दर्जाचा होत नाही. त्याचे स्वत्व हिणकस ठरत नाही. त्याची मान झुकली नाही, ताठ राहिली, हे महत्त्वाचे. त्याच्या पाठीचा कणा वाकला नाही, म्हणूनच त्याच्यापुढे आपली मान झुकवणे हे आनंदाचे आणि गौरवाचे आहे, असे मला वाटते !
आपली स्वद्वेषी वृत्ती
गया हे आपल्या देशातील एक अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र मानले जाते. या तीर्थक्षेत्राचे नावही ‘गय’ या असुराच्या नावावरून मिळालेले आहे आणि त्याचे पावित्र्यही त्या असुराच्या चरित्रातूनच प्राप्त झालेले आहे. आपल्या संस्कृतीमधील एक महान असुर ! कठोर तपस्या करून पावित्र्याची परिसीमा गाठलेला आपला एक पूर्वज ! एक महामानव ! खरे तर आपल्याला त्याचा किती अभिमान वाटायला हवा, त्याच्याविषयी आपल्या मनात किती आदरभाव असायला हवा! खेदाची गोष्ट अशी, की आपण या गयासुराचाच नव्हे, तर एकूण सर्व असुरांचाच द्वेष करतो, त्यांच्याविषयी तिटकारा बाळगतो, त्यांना क्रूर-दुष्ट-कुरूप मानतो, त्यांची निंदा करतो. गयासुरांसारख्या पवित्र व्यक्तींच्या शत्रूनी त्यांच्याविषयी आपल्याला सांगितलेली मतेच आपण खरी मानतो. आपल्याला जणू काही स्वतःचा दृष्टिकोणच नाही, डोळसपणाच नाही. आपल्याच नीतिमान पूर्वजांचा धिक्कार करण्याची केवढी ही स्वद्वेषी वृत्ती ! ही वृत्ती आपल्याला सदैव गुलामगिरीतच जखडून ठेवणार. कधीच स्वतंत्र बनवणार नाही. आपण कोणाचे वारसदार आहोत हे ज्यांना कळत नाही, त्यांच्या पदरी दुसरे काय पडणार ?






Reviews
There are no reviews yet.